दुष्काळी ज्वारी ठरेल उसाला भारी
| स्रोत: BKS-HND तारीख: 16 Jan 2015 14:29:13 |
Thursday , January 01 , 2015 AT 05.45 AM ( IST ) Tags : Agro Special
संवेदनशील अवस्थेत संरक्षित पाण्यासाठी ठिबक सिंचन , योग्य अंतरावर लागवड व विद्राव्य खतांचा वापर या त्रिसूत्रीचा वापर केल्यास ज्वारीचे अवघ्या चार महिन्याचे पीक 16 महिन्यांच्या बागातील ऊस पिकालाही भारी पडू शकते , याचे पीक प्रात्यक्षिक शिरूर तालुक्यातील ( जि . पुणे ) कासारी येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर ( अण्णा ) हरी टेमगिरे यांच्यासह सहा सहकाऱ्यांनी घेतले आहे . पुणे - शिरूर रस्त्यावरच हायवेपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे पीक सध्या ऐन दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.
- संतोष डुकरे
सूक्ष्म सिंचनाचे तंत्रज्ञान सर्वसाधारणपणे बागायती व नगदी पिके विशेषत: फळपिके व भाजीपाला यांच्यासाठी वापरण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो . अन्नधान्य पिकांसाठी त्याचा वापर फारसा कुणी करत नाहीत . मात्र ज्वारीला संवेदनशील अवस्थेत पाणी देण्यासाठी ठिबक सिंचन करण्याचे धाडस दाखवले आहे , शिरूर तालुक्यातील कासारी ( जि . पुणे ) येथील मधुकर टेमगिरे , दहिवडी यथील गजानान इंगळे , करडे येथील भाऊसाहेब पळसकर व निमोने यथील गनिश काळे व सहकाऱ्यांनी . सध्या या शेतकऱ्यांचे एकूण सहा एकर क्षेत्रावरील ज्वारी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे . हे सर्व शेतकरी भारतीय किसान संघाचे सदस्य आहेत . किसान संघामार्फत याच धर्तीवर सोलापूर , नांदेड व लातूर जिल्ह्यांतही ज्वारी उत्पादकतावाढ प्रात्यक्षिके घेण्यात आली आहेत.
आधी प्रयोग मग प्रात्यक्षिके
- नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागात ठिबक सिंचावर ज्वारी लागवडीचे सलग दोन वर्षे 10 गुंठे क्षेत्रावर प्रयोग घेण्यात आले.
- किसान संघाचे सदस्य व कृषी पदवीधर असलेल्या केशव म्हस्के यांच्या सल्ल्यानुसार कुळधरण ( ता . कर्जत , जि . नगर ) येथील कांतीलाल गुंड यांच्या शेतात प्रयोग झाला होता . तिथे रोपवाटिकेमध्ये ज्वारी रोप तयार करून त्याची पुनर्लागवड ठिबक सिंचनवर शेतामध्ये करण्यात आली . प्रयोगात प्रती कणीस सरासरी 200 ग्रॅम उत्पादन मिळाले.
- राळेगणसिद्धी गावातील सदाशिव मापारी यांच्या शेतात झाला . यात टोकन पध्दतीने लागवड व ठिबकचा वापर करण्यात आला . हा प्रयोग पाहण्यासाठी शिरूरमधील दौंडकर स्मारक समितीमार्फत टेमगिरे यांच्यासह 40 शेतकऱ्यांची अभ्यास सहल नेली होती . त्या प्रेरणेतून शिक्रापूर परिसरातील चार गावांमध्ये चालू रब्बी हंगामात 6 एकर क्षेत्रातील प्रात्यक्षिके घेण्यात येत आहे.
प्रयोगाच्या घेतल्या काटेकोर नोंदी
- एक ऑक्टोंबर 2014 रोजी टेमगिरे यांनी एक बाय एक फुटावर एकेका बीजाची लागवड केली . ठिबकसाठी दोन ओळींमध्ये एक लॅटरल ठेवण्यात आली.
- यानंतर 17 व 18 ऑक्टोंबरला नर्सरीतील रोपांचा वापर करून गॅप फिलिंग केले.त्यासाठी कीडनाशक , बुरशीनाशकाच्या दोन प्रतिबंधात्मक फवारण्या घेण्यात आल्या.
- दरम्यान 24 ऑक्टोंबरला 10:26:26, युरिया व सूक्ष्म मूलद्रव्य खतांचा डोस दिला .
- यानंतर नोव्हेंबरच्या 2 ते 11 तारखेदरम्यान दररोज एक दिवसाआड प्रती दिवस पाच किलो याप्रमाणे 0:52:34 व युरिया आणि कॅलशिअम नायट्रेट विद्रव्य दिले . दोन वेळा खुरपणी करून तणनियंत्रण करण्यात आले.
रोप तयार केली तर …
ज्वारीचे रोप तयार करून त्यांची ठिबक सिंचन पध्दतीने लागवड केल्यास एकसमान वाढ , उत्पादनक्षम ताटांची अधिकतम संख्या , यामुळे उत्पादनात निश्चितच भरीव वाढ येत असल्याचे कर्जत येथे केलेल्या प्रयोगातून सिद्ध झाले . मात्र ज्वारीला रोप तयार कण्यासाठी अतिरिक्त 20 हजार रुपये खर्च येतो . हा खर्च टाळण्यासाठी कासारी येथील या प्रात्यक्षिकात रोपांऐवजी टोकण पद्धतीने ज्वारी लागवड करण्यात आली . एक एकरमध्ये किमान 30 ते 32 हजार रोपे ठेवण्यात आली आहेत . पीक व कणसाचा आकार पाहता या क्षेत्रातून एकरी किमान 40 क्विंटल ज्वारी उत्पादनाचा शेतकरी व तज्ज्ञांचा अंदाज आहे.
उत्पादन खर्च एकरी 40 हजार
टेमगिरेंनी या प्रात्यक्षिकाच्या सुरुवातीपासूनच काटेकोर नोंदी व हिशेब ठेवले आहेत.
- ठिबकवरील या ज्वारी उत्पादनासाठी जमिनीची पूर्वमशागतीसह एक ट्रक शेणखत, लागवड, दोन खुरपण्या, दोन फवारण्या, ठिबक सिंचन साहित्य भाडे यापोटी आतापर्यंत 30 हजार खर्च झाले आहेत.
- कापणी, मळणीसह धान्य हाती पडेपर्यंत आणखी 10 हजार रुपये खर्चांचा अंदाज आहे.
- एकूण उत्पादन खर्च एकरी 40 हजार रुपयापर्यंत होईल.
उसाहून अधिक फायदा शक्य
40 क्विंटल ज्वारीपासून प्रती क्विंटल तीन हजार रुपये दराने एक लाख 20 हजार रुपये व चाऱ्यापासून सुमारे 20 हजार रुपये उत्पन्न मिळू शकते. उत्पादनात खर्च 40 हजार रुपये वजा जाता एक लाख रुपये निव्वळ नफा हाती राहू शकतो. शिवाय खरीप व उन्हाळी हंगामात पाणी उपलब्धतेनुसार शेतकरी अन्य पिकेही घेऊ शकतात. त्यातुलनेत शिक्रापूर परिसरात शेतकऱ्यांना ऊस पिकापासून वार्षिक एकरी सरासरी 50 हजार रुपये नफा होतो.
“गेल्या वर्षी १० गुंठ्यांवर प्रयोग झाला . यंदा तो सहा एकरावर केला आहे . यातील फायद्यानुसार यापुढील काळात शेतकरी स्वतः हून या पध्दतीने उत्पादन घेतील . किसान संघाच्या माध्यमातून राज्यातील सर्व ज्वारी उत्पादक भागात प्रात्यक्षिक घेण्याचा प्रयत्न आहे.”
- मधुकर टेमगिरे, प्रयोगशील शेतकरी व प्रांत कोशाध्यक्ष , भारतीय किसान संघ
कृषी विभागाने परिसरात 500 हेक्टरवर ज्वारी पीक प्रात्यक्षिके घेतली आहेत . या प्रयोगाचे निष्कर्ष आशादायक असून , पुढील हंगामात या पध्दतीने ज्वारी उत्पादकतावाढीस चालना देण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न राहील.
- सुरेश जोशी , मंडळ कृषी अधिकारी , शिक्रापूर
संपर्क -
मधुकर टेमगिरे – 9403722447 , 9850099847
केशव म्हस्के - 9822075738